तळेगावंमध्ये जोरदार फटकेबाजी ; संगमनेरची जागा भाजपच्या वाट्याला ?
माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी तळेगाव दिघे, संगमनेर येथे आयोजित सभेत जोरदार भाषण करत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर तीव्र हल्ला चढवला. "तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय" या घोषणेने भाषणाची सुरुवात करत, डॉ. विखे यांनी तालुक्यातील चाळीस वर्षांची दहशत संपवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ही सभा केवळ यात्रा नाही, तर तरुणाईने आपलं उज्वल भविष्य साध्य करण्यासाठी एकत्र येऊन दहशत मोडून काढण्याची आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत संगमनेर तालुक्यातील सत्ता बदल होणार असल्याचेही ते ठामपणे म्हणाले.
डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या भाजप उमेदवारीबाबत चर्चा सुरू होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना उमेदवारी नाकारल्याच्या बातम्या पसरवण्यात आल्या होत्या, ज्याचा त्यांनी तीव्र समाचार घेतला. त्यांनी या बातम्यांना खोटं ठरवत, लवकरच संगमनेर मतदारसंघ भाजपकडे जाईल असा आत्मविश्वास व्यक्त केला. या वक्तव्याने उपस्थितांमध्ये उत्साह संचारला. यावेळी, लोणीहून तळेगावकडे येताना डॉ. विखे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी आणि मिरवणूक यामुळे संपूर्ण सभेला उत्सवी वातावरण मिळाले.
सभेत थोरात यांचे नाव न घेता, त्यांच्यावर चौफेर टीका केली. त्यांनी विचारले की, जे लोक आज विकासाच्या गोष्टी करत आहेत, तेच वर्षानुवर्ष तालुक्यातील महिलांच्या डोक्यावरील हांडीही उतरवू शकले नाहीत. विखे यांनी दावा केला की तालुक्यातील राजकारण केवळ नातेवाईकांसाठी चालत आहे, आणि सत्ता काही विशिष्ट गटांमध्येच फिरते. मात्र, तळेगाव व निमोण परिसरातील तरुणांनी या मानसिकतेला विरोध करीत परिवर्तन घडवले आहे. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीतही असेच परिवर्तन घडवण्याची गरज आहे, असे सांगितले.
![]() |
जाहिरातीसाठी 9325024536 |
सभेच्या भाषणात, डॉ. विखे-पाटील यांनी तालुक्यातील ठेकेदार संस्कृतीवर जोरदार टीका केली. त्यांनी स्पष्ट केले की ठेकेदारांच्या नियंत्रणाखाली असलेल्या तालुक्याचा कधीच विकास होणार नाही. त्यांनी महिलांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले आणि तालुक्यातील महिलांनीही बदलासाठी पुढे यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करताना सांगितले की, ज्या लोकांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडत आहेत, ते आमदारही होणार नाहीत, असे टोमणे मारले.
डॉ. विखे-पाटील यांनी दावा केला की गेल्या चाळीस वर्षांत तालुक्यातील राजकारण्यांना अनेक पदं मिळाली, पण तालुक्यासाठी निधी आणण्याचं त्यांना जमलं नाही. त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून ४४ कोटी रुपयांचा निधी तळेगावच्या विकासासाठी आणण्यात आला आणि निळवंडे धरणाचे पाणी शेतीपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवलं. याच पद्धतीने, त्यांनी भोजापूर चारीचं पाणीही आणण्याचं आश्वासन दिलं.
सभेच्या शेवटी, डॉ. विखे-पाटील यांनी तालुक्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत म्हटलं की, "तुमची मनमानी आता संपली पाहिजे." आजची सभा तालुक्यातील परिवर्तनाची सुरुवात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, संगमनेर तालुक्यातील पुढील चाळीस वर्षं युवकांच्या उज्वल भविष्याची असतील आणि येत्या दोन दिवसांत संगमनेरची जागा भाजपच्या हाती येईल, याबद्दल त्यांना ठाम विश्वास होता.
0 टिप्पण्या