बाळासाहेब थोरातांना धक्का ! अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

संगमनेर तालुक्यातील राजकारणात मोठा बदल घडला आहे. गावातील अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसला रामराम करत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाविकास आघाडीतून मुख्यमंत्री पदाच्या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेले बाळासाहेब थोरात यांच्या गटावर दबाव वाढला आहे. विशेष म्हणजे, पेमगिरी गावातून काँग्रेसची संवाद यात्रा सुरू झाली असताना या गावातील काँग्रेसच्या सदस्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे थोरात गटात चिंता पसरली आहे.

या घटनेने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या स्थितीत मोठे आव्हान निर्माण केले आहे. बाळासाहेब थोरात हे गेल्या अनेक पंचवार्षिकांपासून संगमनेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आजवर त्यांच्या विरोधात कोणताही मजबूत उमेदवार उभा नव्हता, त्यामुळे त्यांनी आपली सत्ता टिकवून ठेवली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र सुजय विखे पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे थोरात गटात मोठी खळबळ उडाली आहे.

विखे पाटलांच्या राजकीय रणनीतीमुळे थोरातांना आता जमिनीवर उतरून मतदारसंघात फिरावे लागणार आहे. थोरात गटानेही याला प्रत्युत्तर म्हणून जयश्री थोरात यांच्या नेतृत्वात मतदारसंघात संवाद यात्रा सुरू केली आहे. मात्र, या यात्रेचा थोरातांना किती फायदा होईल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. सध्या तरी पेमगिरीमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने थोरात यांना मोठा धक्का बसला आहे.

जाहिरातीसाठी 9325024536

राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, विखे पाटलांनी त्यांच्याच मतदारसंघात थोरातांना अडकवण्याची योजना आखली आहे. महसूल मंत्री असताना राधाकृष्ण विखे पाटलांनी संगमनेरात अनेक दौरे करून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता. आता भाजपने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवून थोरातांना आणखी कमजोर करण्याचा प्रयत्न केला आहे. या परिस्थितीत बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या समर्थकांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप यांच्यातील लढाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Contact form