संगमनेर शहरात बेहिशोबी रोकड हस्तगत झाल्याच्या घटनेने व्यापारी वर्गात खळबळ उडवली आहे. 3 लाख 84 हजार रुपयांच्या हस्तगतीनंतर अवघ्या 24 तासांत गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 42 लाख 15 हजार रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
![]() |
जाहिरातीसाठी 9325024536 |
नगर जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणार्या इसमांविरुद्धची मोहीम सुरु असताना, गुप्त माहिती मिळाली की संगमनेर येथील सहदेव ज्वेलर्समध्ये मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी रोकड साठवली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास पथक तयार केले. उपनिरीक्षक तुषार धाकराव आणि त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी यांनी तपास सुरू केला. सहदेव ज्वेलर्सच्या वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत पोलीस दाखल झाले. तेथे तपासणी करताना मुकेशकुमार रमेशभाई पटेल आणि धवलकुमार जसवंतभाई पटेल यांच्या ताब्यातून बेहिशोबी रोकड हस्तगत करण्यात आली.
चौकशी दरम्यान, त्यांनी ही रक्कम हवालामार्फत लावली असल्याचे कबूल केले. त्यांनी सांगितले की, सदर रक्कम ज्वेलर्सचे मालक भावेश पटेल आणि आशिष वर्मा यांची आहे. पोलिसांनी सखोल चौकशी करत असताना हे स्पष्ट झाले की, ही रक्कम बेकायदेशीर मार्गाने जमवण्यात आली आहे आणि शासनाचा कर टाळण्यासाठी हवाल्यामार्फत विल्हेवाट लावण्याचे नियोजन होते. या कारवाईत 40 लाख 26 हजार रुपये मुकेशकुमार पटेलकडून, तर 1 लाख 89 हजार रुपये धवलकुमार पटेलकडून जप्त करण्यात आले. एकूण 42 लाख 15 हजार रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त करून ती कायदेशीर ताब्यात घेण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात बेहिशोबी मालमत्तेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहे. या प्रकारामुळे संगमनेर शहरातील व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे, आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक कडक कारवाया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0 टिप्पण्या