देशभरात नकली नोटांचे रॅकेट मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याच्या घटना समोर येत असताना, आता त्याचे लोण संगमनेरपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अन्य ठिकाणी केलेल्या कारवाईदरम्यान ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या चौकशीतून संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे बनावट नोटा छापण्याचा कारखाना कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर दिल्ली पोलिसांचे विशेष पथक स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुंजाळवाडीत दाखल झाले आणि त्यांनी येथे छापा टाकून मोठ्या प्रमाणावर छपाईसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले.
या कारवाईदरम्यान, बनावट चलनी नोटा छपाईसाठी वापरण्यात येणारा प्रिंटर, विशेष कागद आणि शाई पोलिसांनी हस्तगत केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात संशयित असलेला रजनीकांत राजेंद्र रहाने हा पूर्वी गुंजाळवाडी ग्रामपंचायतीत वसुली कारकून म्हणून कार्यरत होता, अशी माहितीही तपासात समोर आली आहे. इतकेच नव्हे, तर अलीकडच्या काळात त्याने तालुक्यात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केली असल्याची माहिती पोलिस तपासातून मिळत आहे. त्यासाठी त्याने बनावट नोटांचा वापर केला होता का, याचा शोध सध्या सुरू आहे.
याप्रकरणी संशयित आरोपी फरार असून, त्याच्या कनेक्शनमधील इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास अधिक गतीने सुरू आहे. संगमनेर तालुक्यात अजून किती जण या रॅकेटमध्ये सामील आहेत, याचा शोधही घेतला जात आहे. प्राथमिक तपासानुसार, या नकली नोटा केवळ स्थानिक स्तरावर नव्हे, तर मोठ्या प्रमाणावर बाहेरही पुरवल्या जात होत्या, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
दिल्ली पोलिसांनी केलेल्या तपासात संगमनेर तालुक्यातील व्यक्ती देशव्यापी बनावट नोटा रॅकेटमध्ये सामील असल्याचे समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर, बँका, व्यापारी आणि नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नकली नोटा ओळखण्यासाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येणार असून, कोणत्याही संशयास्पद नोटांची तक्रार त्वरित पोलिस ठाण्यात करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या प्रकरणात आणखी कोण कोण सामील आहे, हे लवकरच उघड होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आरोपीच्या अटकेनंतर या रॅकेटच्या अधिक खोलात जाऊन तपास करता येईल आणि त्याच्या मागील मोठ्या मास्टरमाइंडपर्यंत पोहोचता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे संगमनेर परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, नकली नोटांचे हे जाळे संपूर्ण जिल्ह्यात पसरले आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत. दिल्ली पोलिस आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईनंतर लवकरच या प्रकरणाचा संपूर्ण पर्दाफाश होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या