संगमनेरात गोंधळ मिसळ केंद्रावर पोलिसांचा छापा: तरुण-तरुणींचे अश्लिल चाळे उघडकीस

संगमनेर: गेल्या दोन वर्षांत संगमनेरातील छुपे अश्लील केंद्र आता हळूहळू उघडकीस येऊ लागले आहेत. शहरात विविध ठिकाणी कॅफे हाऊस चालवण्याच्या नावाखाली हे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. कॅफे हाऊसच्या आडून चालणाऱ्या या व्यवसायांमध्ये मागील बाजूने अश्लील कृत्ये घडत असल्याचे प्रकार उघड झाले आहेत. गेल्या दोन वर्षांत असे ७ ते ८ प्रकरणे समोर आली आहेत, जे सुसंस्कृत संगमनेरासाठी अत्यंत निंदनीय बाब आहे. या घटना रोखण्यासाठी पोलीसांनी कडक पावले उचलण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या अवैध केंद्रांमुळे शहरातील वातावरण दूषित होत असून, अशा केंद्रांवर त्वरित कारवाईची गरज आहे.

अधिकृत माहितीवरून असे समजते की या अवैध कॅफे हाऊसमध्ये अल्पवयीन मुलींसह तरुणींवरही अत्याचार होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलीसांनी कारवाई करूनही या प्रकारांचा पूर्णपणे बंदोबस्त होऊ शकलेला नाही. शहरात अद्यापही अशा प्रकारचे व्यवसाय सुरूच असल्याचे उघड होत आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी 'गोंधळ मिसळ' नावाच्या दुकानातील छुप्या कॅफेवर पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने धाड टाकली. या ठिकाणी लाकडी प्लायवूडच्या कंपार्टमेंटमध्ये पडद्याआड अश्लील कृत्ये करणाऱ्या जोडप्यांची पोलिसांनी गाठ घेतली.

पोलिसांच्या कारवाईत मोठी पळापळ झाली. पोलिसांचा छापा पडताच काही युवक आणि युवती तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले, तर काहींना पोलिसांनी पकडले. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांना या अवैध कॅफेबद्दल माहिती मिळाल्यानंतर हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय मेंगाळ आणि महिला पोलीस ताई शिंदे यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. या कॅफेमध्ये लाकडी प्लायवूड वापरून वेगवेगळे कंपार्टमेंट तयार करण्यात आलेले होते. त्यात गडद रंगाचे पडदे लावलेले होते, जे अश्लील कृत्ये लपवण्यासाठी वापरले जात होते.

आत प्रवेश केल्यानंतर पोलिसांनी तिथे काही जोडपी अश्लील चाळे करताना आढळून आली. त्या जोडप्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांना कायदेशीर समज दिली. या ठिकाणी कॉफी शॉप म्हणून कॅफे चालवला जात होता, परंतु त्याचा परवाना नसल्याचे आढळून आले. शिवाय, कॉफी बनवण्याचे कोणतेही साहित्यही तिथे सापडले नाही. त्यामुळे या व्यवसायाचा हेतू काय होता, हे स्पष्ट होते. पोलिसांनी या ठिकाणाचे व्हिडिओ आणि फोटो पुरावे गोळा केले आहेत.

या कारवाईत दौलत बन्सी खाडे (वय ४२, रहिवासी रंगार गल्ली, संगमनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानाच्या मूळ मालकाची देखील चौकशी करण्यात आली असून त्यांच्यावर काय कारवाई होणार, याची माहिती पोलिसांकडून लवकरच मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Contact form