संगमनेर: तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

संगमनेर: तालुक्यातील निळवंडे शिवारात रविवारी एक खळबळजनक घटना उघडकीस आली. एका व्यक्तीने नायलॉन दोरीच्या सहाय्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. ही घटना दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मृत व्यक्तीचे नाव दत्ता हरिचंद्र ढोले (वय ४१) असून, ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी येथील रहिवासी होते.


घटनास्थळी प्रथम माहिती मिळाल्यानंतर पोलीस पाटील अशोक कोल्हे यांनी घटनास्थळी जाऊन खात्री करून संगमनेर तालुका पोलीस ठाण्याला कळविले. यानंतर पोलीस निरीक्षक देवीदास ढूमने यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल जायभाये आणि पोलीस सचिन उगले यांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आणि मृतदेह झाडावरून खाली उतरवण्यात आला.


मृत व्यक्तीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. झाडाखाली त्यांची दुचाकी (क्र. एमएच २०, एफए २३५१) पडलेली होती. दुचाकीच्या जवळच सापडलेल्या आधारकार्डच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख पटली. पोलिसांनी मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवला. मात्र, दत्ता ढोले यांनी आत्महत्या का केली आणि ते संगमनेर तालुक्यात का आले होते, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. 


याप्रकरणी पोलीस पाटील अशोक अनाथ कोल्हे यांनी पोलिसांत खबर दिली, आणि त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल संपत जायभाये करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Contact form