योगगुरु बाबा रामदेव आणि त्यांची पतंजली आयुर्वेद कंपनी पुन्हा एकदा नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. यावेळी वादाचा विषय पतंजलीच्या 'दिव्य दंतमंजन' या दात घासण्याच्या पावडरवर आहे, ज्यावर मांसाहारी घटक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वकील यतीन शर्मा यांनी दिल्ली हायकोर्टात यासंदर्भात याचिका दाखल केली असून, या याचिकेनंतर हायकोर्टाने बाबा रामदेव यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणात हायकोर्टाने तातडीने उत्तर देण्याचे आदेश दिले असून, पुढील सुनावणी 28 नोव्हेंबरला होणार आहे. मागील काही महिन्यांपासून बाबा रामदेव आणि पतंजली कंपनी विविध वादांच्या भोवऱ्यात अडकले आहेत. विशेषतः कोरोना व्हायरसच्या लसीविषयी केलेल्या दाव्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकारले होते आणि जाहीर माफी मागण्याचे आदेश दिले होते. आता नवीन वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या 'दिव्य दंतमंजन'मध्ये 'समुद्र फेन' नावाचा मांसाहारी पदार्थ असल्याचा दावा करण्यात आला आहे. उत्पादनाला शाकाहारी म्हणून हिरवे लेबल लावून चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत वकील यतीन शर्मा यांनी भावनांना धक्का बसल्याचे नमूद केले आहे. याच प्रकरणातील एक पूर्वीच्या घटनेत, 2023 मध्येही दिल्लीतील एका लीगल फर्मने असेच आरोप करत नोटीस धाडली होती, ज्यावर पतंजलीने कायदेशीर उत्तर दिले होते.
0 टिप्पण्या