नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत, शिवसेनेला पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची कमतरता असल्यामुळे मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर, संगमनेर विधानसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले. मात्र, त्यांना ठोस दिशा मिळत नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले. तालुक्यात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची कमी आणि भाजपमध्ये दाखल झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रभाव यामुळे, या निवडणुकीत संगमनेरची जागा शिवसेनेऐवजी भाजपला मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जाऊ लागला.आता, राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी "संगमनेर" किंवा "राहुरी"तून विधानसभा लढवण्याची इच्छा जाहीर केल्याने, संगमनेर भाजपच्या मागणीला आणखी बळ मिळाले आहे. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात संगमनेरची जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता वाढली आहे. गुरुवारी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना, डॉ. सुजय विखे पाटील यांनी विधानसभा लढवण्याचा मानस व्यक्त करताना कोपरगाव व श्रीरामपूर मतदारसंघाच्या अडचणी सांगितल्या. त्यांनी संगमनेर आणि राहुरी हे दोन पर्याय खुले असल्याचेही नमूद केले.राहुरीत माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यातील राजकीय वादामुळे, ते संगमनेरमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे दिसते. मात्र, त्याचवेळी त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये समन्वय न झाल्यास, आणि आपल्यावर कार्यकर्त्यांचे एकमत झाल्यासच निवडणूक लढवण्याचे स्पष्ट केले. त्यामुळे, उमेदवार कोणताही असला तरी, संगमनेरची जागा भाजपच्या पारड्यात जाण्याची शक्यता दाट आहे.
0 टिप्पण्या