संगमनेर येथील व्यापारी संकेत शिवाजी कोकणे यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त व्याजदराने पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. शशांक चंद्रशेखर वडके आणि त्याची पत्नी प्रियांका शशांक वडके राहणार भिवंडी, जिल्हा ठाणे या जोडप्याने कोकणे यांच्याकडून लाखो रुपये उकळले आहेत. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोकणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वडके दांपत्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांची पत्नी प्रियंका हिची एजन्सी असल्याचे सांगून सहा टक्के दराने पैसे मिळतील असे आश्वासन दिले. कोकणे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून 16 मे 2019 रोजी 20 लाख रुपये, 17 मे 2019 रोजी 5 लाख रुपये आणि 20 मे 2019 रोजी 2 लाख रुपये रोख दिले. एकूण 30 लाख रुपये देण्यात आले होते. वडके यांनी त्यांना बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये नोकरी असल्याचे सांगितले आणि काही काळासाठी प्रत्येकी दहा ते पंधरा हजार रुपये देत राहिले.
परंतु, नंतर कोकणे यांना संशय आल्यामुळे त्यांनी आपले पैसे मागितले. वडके यांनी पैसे परत देण्याचे आश्वासन दिले पण नंतर त्यांनी संपर्क तोडला. अधिक चौकशी केली असता, कोकणे यांच्या नावावर कोणतेही खाते नसल्याचे आणि ग्लोब कॅपिटल मार्केटिंग कंपनीत कोणतेही रजिस्ट्रेशन नसल्याचे उघड झाले. फक्त 3 लाख 54 हजार 828 रुपये परत मिळाले, परंतु उर्वरित 26 लाख 45 हजार 172 रुपये वडके दांपत्याने फसवले असल्याचे स्पष्ट झाले. कोकणे यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे आणखी दोन मित्र या व्यवहाराचे साक्षीदार आहेत, आणि त्यानुसार पोलीस अधिक तपास करीत आहेत.जाहिरातीसाठी संपर्क करा - aaplsangamnerr@gmail.com
0 टिप्पण्या