महाराष्ट्राला संत आणि समाज सुधारकांची समृद्ध परंपरा आहे. महाराष्ट्रात महिलांचा नेहमीच सन्मान केला जातो, परंतु महायुती सरकारने मते खरेदी करण्याच्या नावाखाली महिलांचा अपमान केला आहे, ज्यामुळे त्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचला आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला कधीही लाचार होणार नाहीत. सरकारने जाहीर केलेला पैसा हा जनतेचा आहे, महायुतीचा नाही. त्यामुळे, रवी राणांसह महायुती सरकारने महिलांची माफी मागावी, अशी मागणी दुर्गाताई तांबे यांनी केली आहे.
संगमनेर बस स्थानक येथे, संगमनेर तालुका काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीने रवी राणा यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी महाराष्ट्रातील महिलांच्या सन्मानाच्या रक्षणासाठी महायुती सरकारने तात्काळ माफी मागावी, अशी मागणी केली. महागाई, बेरोजगारी आणि इतर मूलभूत समस्यांकडे लक्ष वळवण्यासाठी सरकारने फसव्या घोषणा केल्याचेही त्यांनी सांगितले. युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करत महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिलांचा अपमान झाल्याचे सांगितले आहे.
0 टिप्पण्या