संगमनेर पंचायत समिती ते समनापूर दरम्यानच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे, ज्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. हा कोल्हार-घोटी राज्यमार्ग आहे, जो सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरला आहे. या रस्त्याचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाल्याची तक्रार अनेकदा नागरिकांनी केली होती.
रस्ता पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच त्यावर मोठे खड्डे पडले, परंतु संबंधित विभागाने याची डागडुजी केली नाही. परिणामी, या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक छोटे-मोठे अपघात या ठिकाणी घडत आहेत, त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावरच संबंधित विभागाला जाग येणार का, असा सवाल विचारला जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या राजमार्गावर ठिकठिकाणी पाणी साचले आहे, विशेषतः पंचायत समिती ते समनापूर दरम्यानच्या रस्त्यावर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे ते खड्डे दिसेनासे झाले आहेत, त्यामुळे वाहने या खड्ड्यांवर आदळून त्यांचे मोठे नुकसान होत आहे, तर कधी कधी अपघातही होत आहेत. त्यामुळे तात्काळ याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.
0 टिप्पण्या