साकूर येथे आयोजित युवा संकल्प मेळाव्यात डॉ. विखे पाटील यांनी पुन्हा एकदा विधानसभेतील विरोधी पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांचा नामोल्लेख न करता, त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "चाळीस वर्षे सर्व सत्तास्थाने हाती असूनही, पठार भागातील जनतेला पाणी मिळवून देण्यात अपयश आले. या भागातील युवकांना रोजगाराच्या संधी दिल्या नाहीत."
विखे पाटील यांनी पुढे सांगितले की, "जेव्हा मी या निष्क्रीयतेवर टीका करतो, तेव्हा तुम्ही थेट 'बाप' काढता. आमच्या भागात येऊन, तुम्ही आमच्या वडिलांवर टीका करता, पण आम्ही संयमाने राजकारण करणारी माणसं आहोत. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी विखे पाटील कुटुंबीय नेहमीच आवाज उठवत आले आहेत. आम्ही या तालुक्यातील प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आलो आहोत, आणि साकूरची सभा हे परिवर्तनाचे पहिले पाऊल आहे."
विखे पाटील यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, "वर्षानुवर्षे ज्या जनतेन तुम्हाला निवडून दिले, त्या जनतेचा विश्वासघात करून, तालुक्याच्या राजकारणात 'बाप' काढण्याचा प्रयत्न केला जातोय. पण मी कोणाच्या बापाबद्दल नाही, तर आमदाराच्या निष्क्रीयतेबद्दल बोलत होतो." त्यांनी असेही सांगितले की, लोकशाहीत जनता हीच मायबाप असते, आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता ठरवेल की तालुक्याचा खरा 'बाप' कोण आहे. त्यांनी आघाडीच्या नेत्यांवर टीका करताना, ताईच्या (थोरातांच्या) गाडीत बसलेले लोकच त्यांचा घात करतील, असे सूचक वक्तव्यही केले.
डॉ. विखे पाटील यांनी तालुक्यातील युवकांना प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी उभे राहण्याचे आवाहन केले. त्यांनी जोरदारपणे सांगितले, "तुम्ही आमचा आवाज दाबू शकत नाही. जेवढा आवाज दाबाल, तेवढा तो तुमच्या घरापर्यंत पोहोचेल." यामुळे त्यांचा आवाज अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
![]() |
जाहिरातीसाठी 9325024536 |
विखे पाटील यांनी आपले राजकीय उद्दिष्ट स्पष्ट केले की, राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल, आणि तालुक्यातील आमदारही महायुतीचाच असावा. ते म्हणाले, "उमेदवार कोणीही असो, डॉ. सुजय विखे तुमच्या प्रश्नांसाठी कायमस्वरूपी बांधील राहील." त्यांनी असेही स्पष्ट केले की, तालुक्यातील जनता परिवर्तनासाठी तयार आहे, आणि प्रस्थापितांना योग्य वेळेत धडा शिकवला जाईल.
साकूरच्या सभेत विखे पाटील यांनी त्यांच्या भाषणातून प्रस्थापितांविरोधातील राजकीय लढ्याची दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले की, सामान्य जनतेच्या न्यायासाठी लढा देण्याचा विखे पाटील कुटुंबाचा वारसा आहे, आणि या लढ्यात ते तालुक्यातील जनतेसोबत आहेत.
0 टिप्पण्या