संगमनेरात नशिले पदार्थ आणि ड्रग्सचा धुमाकूळ: युवकांमध्ये वाढती चिंता

संगमनेर शहरात अलीकडे नशिले पदार्थ आणि ड्रग्सचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गांजा, एमडी, नाईट्रो, टर्मीन, आणि इतर नशेच्या गोळ्या तसेच इंजेक्शनची तस्करी होणे एक गंभीर समस्या बनली आहे. काही महिन्यांपूर्वी शहरातील मध्यवर्ती भागात पोलिसांना नशिला पदार्थ गर्द सापडला होता, आणि त्या वेळी स्थानिक पातळीवर कारवाई करण्यात आली होती. परंतु, मोठे सूत्रधार मात्र मोकाटच राहिले, ज्यामुळे या धंद्याचा पुन्हा फैलाव झाला. त्यामुळे शहरातील युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. 

संगमनेर हे एक विकसित शहर आहे, जेथे शिक्षण संस्थांचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथे विद्यार्थी आणि युवकांची संख्या मोठी आहे. ड्रग्स तस्कर आणि नशेचे व्यापार करणाऱ्यांसाठी ही मंडळी प्रमुख लक्ष ठरली आहेत. शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नशेच्या जाळ्यात ओढणे तस्करांना सोपे जात आहे. शहरात गांजा, एमडी पावडर, अफू पावडर यांची तस्करी जोरात सुरू असून, पुणे, नाशिक आणि श्रीरामपूर सारख्या भागांतून हे नशिले पदार्थ संगमनेरमध्ये पोहोचवले जात आहेत. ओडिशा राज्यातून गांजा आणि इतर महत्त्वाचे ड्रग्स मोठ्या प्रमाणावर तस्करी करून पहाटेच्या वेळेत महामार्गालगत याची देवाणघेवाण केली जाते. या तस्करीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला आहे, ज्यामुळे संशय टाळणे सोपे झाले आहे. मोटरसायकलवरून ये-जा करत विद्यार्थी ड्रग्सची वाहतूक करत आहेत, जेणेकरून त्यांच्यावर संशय येऊ नये. 

संपूर्ण संगमनेर हे आता मटका, जुगार अड्डे, गोवंश हत्या आणि गुटखा व्यवसायांसोबतच गांजा आणि ड्रग्स तस्करीचे केंद्र बनले आहे. एमडी पावडर, मॉली, एक्सटसी आणि सुपरमॅन यांसारख्या ड्रग्सने युवकांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम केला आहे. हे ड्रग्स महागडे असूनही विद्यार्थी आणि युवक त्याचा सर्रास वापर करत आहेत. १० ते ३० हजार रुपये प्रति ग्रॅमच्या दराने या पदार्थांची विक्री सुरू आहे, आणि विशेष म्हणजे त्यांचा वास किंवा इतर शारीरिक परिणाम लगेच लक्षात येत नाही. त्यामुळे कुटुंबांनाही हे समजत नाही की त्यांचे मुलगे या व्यसनाधीनतेत अडकले आहेत. 

विशेषत: नाईट्रो गोळ्या आणि टर्मिन नावाचे इंजेक्शन मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत. नाईट्रोग्लिसरीनचा वापर मेंदू शांत करण्यासाठी केला जात आहे, तर टर्मिन इंजेक्शन हे ऑपरेशनमध्ये रक्तदाब नियंत्रणासाठी वापरले जात असले तरी आता त्याचा नशा करण्यासाठीही वापर सुरू झाला आहे. संगमनेर हे या अवैध धंद्याचे केंद्र बनले असून ओडिशा, जुन्नर आदी भागांतून ड्रग्सची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. युवक आणि विद्यार्थ्यांच्या मोठ्या सहभागामुळे या व्यवसायाचा फैलाव झाल्याचे स्पष्ट होते. 

युवकांच्या राहणीमानावर याचा मोठा परिणाम झाला आहे. अचानक मुलांकडे पैसा, महागड्या वस्तू, गाड्या, सोन्याच्या साखळ्या आणि महागडे मोबाइल दिसू लागले आहेत. यामुळे शहरात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. विद्यार्थी आणि युवकांमध्ये भांडणे आणि हिंसाचार वाढले आहेत. संगमनेर आणि त्याच्या परिसरातील छोट्या गावांतून गांजा विक्री देखील जोरात सुरू आहे. ग्रामीण भागातून नशिल्या पदार्थांची वाहतूक सोपी असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. काही वर्षांपूर्वी पठार भागातील दोन तरुणांना ड्रग्स तस्करी आणि विक्रीच्या आरोपात ओडिशा पोलिसांनी पकडले होते, यावरून या धंद्याचे गांभीर्य अधिक स्पष्ट होते. 

संगमनेरमध्ये नशेच्या पदार्थांचा वाढता वापर आणि त्याच्याशी संबंधित गुन्हेगारी ही एक गंभीर समस्या बनली आहे. युवा पिढीचे भवितव्य धोक्यात आले आहे, आणि पोलिस याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत की मुद्दामहून दुर्लक्ष करत आहेत, हा एक संशोधनाचा विषय आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Contact form