तालुक्यातील काही जमीन प्रकरणांत मोठे कारस्थान उघड झाले आहे. कुळ हक्काने प्राप्त झालेल्या जमिनींवर हक्क सांगणारे मूळ मालक हयात नसताना, त्यांच्या वारसांचे बनावट आदिवासी प्रमाणपत्र तयार करून, गरीब लोकांच्या जमिनी हडपण्याचे षडयंत्र सुरू आहे. संगमनेर खुर्द मधील अशाच एका प्रकरणात, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद माधवराव कानवडे आणि त्यांच्या टोळीचे नाव समोर आले आहे. या प्रकरणात, अशोक नवले नावाच्या शेतकऱ्याच्या जमिनीवर बनावट कागदपत्रे तयार करून कानवडे यांनी दादागिरी सुरू केली आहे. या अन्यायाविरुद्ध तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने अशोक नवले यांनी स्वातंत्र्य दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
संगमनेर तालुक्यात सुरू असलेल्या या प्रकारामध्ये, बनावट आदिवासी प्रमाणपत्रांच्या आधारे, मूळ मालकांचा शोध घेऊन त्यांची जमीन हडपण्याचे षडयंत्र उघड झाले आहे. अशोक नवले यांच्या तक्रार अर्जातून या धक्कादायक प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. नवले यांच्या तक्रारीनुसार, १९४५ पासून त्यांची जमीन त्यांच्या कुटुंबाच्या कब्जात आहे, आणि त्यांच्या हक्कावर कोणत्याही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही. तथापि, मूळ मालक बाबुराव जाधव हे मराठा (कुणबी) समाजाचे होते, परंतु त्यांच्या वारसांनी खोटे आदिवासी प्रमाणपत्र तयार केले.
२०२१ सालापासून, कानवडे यांनी अशा अनेक वादग्रस्त जमिनींवर नजर ठेवून त्या हडपण्याचे षडयंत्र सुरू केले. त्यांनी सात जणांची टोळी तयार करून, वादग्रस्त जमिनींचे व्यवहार टोळीतील व्यक्तींच्या नावावर करण्यास सुरुवात केली. अशोक नवले यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, कानवडे आणि त्यांच्या टोळीने राजकीय हस्तकांचा वापर करून तालुक्यातील अनेक गोरगरीबांच्या जमिनी हडप केल्या आहेत. २०२१ मध्ये, कानवडे यांनी अशोक नवले यांच्या जमिनीच्या नोंदी कमी करण्यासाठी तहसीलदारांकडे प्रकरण दाखल केले, परंतु तहसीलदारांनीही नवले यांच्या विरोधात निकाल दिला. नवले यांनी त्यांच्या कुटुंबाच्या जमिनीवरील हक्कांचे प्रमाण सादर करून पुढील कारवाई थांबवली. तथापि, कानवडे यांनी त्यांच्यावर दबाव टाकत तक्रारी करण्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.
0 टिप्पण्या