साकुर मध्ये मुलीवर झालेल्या अत्याचार (बलात्कार) करणारा चौथा आरोपी चार महिन्यांनंतर पकडला

 साकुर: दहावीच्या परीक्षेचे रिसीट काढण्यासाठी साकुर गावात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बळजबरी करून साकुरच्या रुबाब पान शॉप मध्ये तिच्यावर अत्याचार बलात्कार केल्यानंतर या मुलीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार चार महिन्यांपूर्वी समोर आला होता. यातील मुख्य आरोपीला सहाय्य करणाऱ्या चौथ्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना सुमारे चार महिन्यांनी यश आले आहे.

विजय शिवाजी खेमनर (वय २९ वर्ष रा. हिरेवाडी, साकुर) असे पोलिसांनी पकडलेल्या चौथ्या आरोपीचे नाव असून त्याला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटना उघडकीस आल्यापासून हा आरोपी फरार होता.दहावीत शिकणारी मुलगी परीक्षेचे रिसीट आणण्यासाठी साकुर गावात आली होती. यावेळी आरोपी सौरभ खेमनर याने तिला बळजबरी करत रुबाब पान शॉप मध्ये नेले. पान शॉप मध्ये तिच्या तोंडाला रुमाल बांधून तसेच दोन्ही हात बांधून तिच्यावर अत्याचार केला. यासाठी अन्य आरोपीने त्याला मदत केली. अत्याचारावेळी आरोपी योगेश खेमनर याने पान शॉपचे शटर बंद करून घेत बाहेरून कुलूप लावले होते.

तर प्रशांत भडांगे व विजय खेमनर यांनी पान शॉपच्या शटरबाहेर थांबून देखरेख करत सौरभ खेमनर याला पीडित मुलीवर अत्याचार करण्यासाठी मदत केली. यावेळी तेथे आलेल्या बाजीनाथ दातीर याला 'तू येथे का आला, निघून जा' अशी विचारणा करत त्याला दमबाजी केली. दरम्यान झालेल्या अत्याचारामुळे इज्जत गेली म्हणून पीडित मुलीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली होती.

त्यामुळे मुख्य आरोपीसह अन्य आरोपींविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३७६ (३), १०९, ३०५, ५०६, ३४ सह बाल लैंगिक अत्याचार संहिता कायदा कलम ४, ८, १२, १७, २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासानंतर घारगाव पोलिसांनी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपी सौरभ खेमनर, प्रशांत भडांगे व योगेश खेमनर या तिघांविरोधात दोषारोप पत्र दाखल केले आहे. तर विजय खेमनर हा फरार होता. तो घरी आल्याची माहिती समजल्यानंतर घारगाव पोलिसांनी त्याला अटक केली.

या घटनेची बाल मानवी हक्क आयोग तसेच राज्य सरकारने देखील गंभीर दखल घेतली होती. आरोपी विजय खेमनर याला जिल्हा न्यायालयासमोर सोमवारी हजर केले असता सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी गुन्ह्याच्या तपासाकामी आरोपीला पोलीस कोठडीची मागणी केली होती. जिल्हा न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी आरोपी विजय खेमनर याला १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Contact form