पोखरी हवेली: १८५ शालेय विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

पोखरी हवेली येथे श्री संत गाडगेबाबा भानुप्रभाकार सेवा प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, १८५ शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी रोख बक्षीसही दिले. मुलांनी हसत खेळत आपली गुणवत्ता सिद्ध करावी, अशा शुभेच्छा सखाराम माळी यांनी दिल्या. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सेवानिवृत्त प्रा. चं. का. देशमुख, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी परशराम पावसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन आगळे, उपाध्यक्ष संदीप खैरे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. सखाराम माळी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचा सल्ला दिला आणि याच्यामुळे भारताचे सुजाण नागरिक तयार होतील, असे सांगितले. प्रा. चं. का. देशमुख यांनी सांगितले की, त्यांच्या संस्थेच्या कार्यात विद्यार्थ्यांचा मोठा वाटा असून, त्यामुळे हे मदतकार्य शक्य झाले आहे. आतापर्यंत २०५ कार्यक्रम घेता आले आहेत, अशी त्यांनी माहिती दिली. परशराम पावसे यांनीही विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले आणि संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. इयत्ता पाचवी ते सातवीच्या ५० विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी व्याकरणाचे पुस्तक, तर इयत्ता पहिली ते चौथीच्या १३५ विद्यार्थ्यांना सुलेखन पाटी देण्यात आली. शालेय परिसरातील पक्ष्यांसाठी धान्य आणि मुलांना पत्रलेखनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी साध्या पत्राचे वाटप करण्यात आले. शालेय साहित्य हातात मिळताच विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने खुलले. सेवा प्रतिष्ठान गरजू कुटुंबीयांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असते. या प्रसंगी तत्कालीन विद्यार्थी आर. जी. पावसे यांनी आपल्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रतिष्ठानला पाच हजार रुपयांची देणगी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एकनाथ साबळे यांनी केले, सूत्रसंचालन सोमनाथ मदने यांनी केले, आणि आभार प्रदर्शन आर. जी. पावसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश साळुंके, शकुंतला शेळके, दस्तगीर शेख, सखाराम पाटील, राजेंद्र सूर्यवंशी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Contact form