संगमनेर नगरपालिका हद्दीतील पथविक्रेता संरक्षण कायद्यानुसार पथ विक्रेता समितीची निवडणूक मंगळवारी बिनविरोध पार पडली आहे. या निवडणुकीत आठ जागांसाठी निवड झाली, परंतु सात सदस्यांचीच निवड बिनविरोध झाली असून, एक जागा रिक्त राहिली आहे. निवड झालेल्या सदस्यांमध्ये दीपक भानुदास साळुंखे (इतर मागासवर्ग),
संतोष गंगाधर मुर्तडक (सर्वसाधारण), महेंद्र मांगीलाल शर्मा (सर्वसाधारण), दीपा सोमनाथ सोनुले (सर्वसाधारण महिला राखीव), सुगंधा किसन धाकतोडे (अनुसूचित जाती महिला राखीव), संजय वसंतराव बागले (विकलांग) आणि नर्गिस शब्बीर आत्तार (अल्पसंख्यांक) यांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण आणि पथविक्री विनियमन) अधिनियम २०१४ नुसार ही निवडणूक श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सोमनाथ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
शासनाने पथ विक्रेत्यांसाठी संरक्षण व पथ विक्री विनियमन कायदा केला आहे. त्यानुसार पथ विक्रेता समिती निवडण्यासाठी ऑगस्टच्या अखेरीस निवडणूक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ८८१ नोंदणीकृत पथ विक्रेता सदस्यांची मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २० सदस्यांची ही समिती असते, ज्यात शासकीय ५, अशासकीय ७ आणि पथ विक्रेत्यांमधून ८ सदस्यांचा समावेश असतो. या निवडणुकीत आठ जागांसाठी सात इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले, ज्यामुळे त्यांची निवड बिनविरोध पार पडली. अशासकीय सदस्यांमध्ये संघटना व समुदाय प्रतिनिधी, निवासी कल्याण संघ, व्यापारी संघ आणि पणन संघाचे प्रतिनिधी असतील, तर शासकीय सदस्यांमध्ये नगरपरिषद, पोलिस, आरटीओ, आणि वैद्यकीय अधीक्षक यांचा समावेश राहणार आहे.
0 टिप्पण्या