संगमनेर तालुक्यात तुमची दडपशाही चालणार नाही : आ. थोरात यांचा मंत्री विखे पाटलांना इशारा

आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्या कारभारावर तीव्र टीका केली आहे. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना त्यांनी विखे पाटलांच्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "तुमचे खोटे बोलणे संपूर्ण राज्याने पाहिले असून मागील अडीच वर्षांत तुम्ही संगमनेर तालुक्याचा छळ केला," असा आरोप त्यांनी केला. पालकमंत्री हा मालक नसतो, तुमची दडपशाही इथे चालणार नाही, असे सांगत थोरात यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील वादग्रस्त घटनेचा उल्लेख करताना थोरात म्हणाले की, "वाईट बोलणाऱ्याला तुम्ही प्रोत्साहन दिले. ही घटना अत्यंत दुर्दैवी होती. अवघ्या दहा मिनिटांत तालुका पेटून उठला होता. त्या वेळी तुम्ही कपाटी-कुपाटीने पळून गेलात." त्यांनी संगमनेर तालुक्याच्या अस्मितेवर जोर दिला आणि पुढील ५० वर्षांत कोणीही तालुक्यात वाईट बोलण्याचे धाडस करणार नाही, असे ठामपणे सांगितले.

या प्रचारसभेच्या अध्यक्षस्थानी सिताराम पावसे होते. व्यासपीठावर महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. आमदार थोरात यांनी यावेळी सांगितले की, "संगमनेरच्या जनतेने प्रेम दिले म्हणूनच मला राज्य आणि देशात काम करण्याची संधी मिळाली. या संधीचा वापर तालुक्याच्या विकासासाठी केला. निळवंडे धरण आणि कालव्यांची कामे पूर्ण केली. मात्र, जे लोक यापूर्वी या कामांना अडथळा निर्माण करत होते, तेच आता येऊन विकासाच्या गप्पा मारत आहेत."

थोरात पुढे म्हणाले की, "ज्यांना चाळीस वर्षांत रस्ताही नीट करता आला नाही, ते इकडे येऊन विकासाच्या गोष्टी सांगत आहेत. तुमचे वडील खासदार होते; मात्र तुम्ही ३५ वर्षांत तालुक्यासाठी काय केले?" विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी संगमनेर तालुक्याचा स्वाभिमान कायम राखण्याची ग्वाही दिली.

धांदरफळ येथील घटनेच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, "त्या घटनेच्या निषेधार्थ अवघ्या दहा मिनिटांत संपूर्ण तालुका रस्त्यावर उतरला. महिला भगिनींनी स्टेजवर चढून आपला रोष व्यक्त केला. पाचशे महिला आणि हजारो पुरुषांनी रात्रभर पोलीस ठाण्यासमोर धरणे धरले. मात्र, प्रशासनाने निष्पक्षपणे काम न करता नागरिकांवर विनाकारण गुन्हे दाखल केले. हे प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला."

तालुक्यातील विकास कामांबाबत बोलताना थोरात म्हणाले की, "विरोधकांनी खडी क्रशर बंद केले, रस्त्यांची कामे रोखली आणि हजारो मजुरांना रस्त्यावर आणले. अनेकांवर खोट्या केसेस दाखल केल्या. विरोधकांचा सन्मान करत आलो; पण त्यांना येथील विकासात अडथळा आणण्याचा अधिकार नाही." या सभेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्याचा आढावा घेत विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली. तालुक्यातील जनतेने कायम आपल्या पाठिशी उभे राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Contact form