संगमनेरमध्ये राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार वाटणार 'वेश्याव्यवसाया'चे परवाने

संगमनेर: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. विविध राजकीय पक्ष आणि उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रलोभने दाखवत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सरळ लढती होणार असल्याचे चित्र असले, तरी मनसे, वंचित आघाडी आणि इतर प्रादेशिक तसेच राष्ट्रीय पक्षांसह बंडखोर व अपक्ष उमेदवारांनी निवडणूक अधिक चुरशीची केली आहे. अशा वातावरणात अनेक पक्षांचे जाहीरनामे समोर येत असताना संगमनेर विधानसभा मतदारसंघातील ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवार भागवत गायकवाड यांच्या जाहीरनाम्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

भागवत गायकवाड यांनी ४७ कलमांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यात शेतकरी, नोकरदार, महिला आणि तरुणांसाठी विविध आश्वासने दिली आहेत. मात्र, या जाहीरनाम्यातील एका वादग्रस्त कलमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या कलमात महिलांना वेश्या व्यवसायासाठी परवाने देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या धक्कादायक घोषणेमुळे शिवसेनेच्या (ठाकरे गट) महिला आघाडीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेत जाहीरनाम्यातील या कलमाला महिलांचा अवमान ठरवून तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्याचा आग्रह धरला आहे.

बुधवारी (ता. १३) या जाहीरनाम्यामुळे संगमनेरमध्ये मोठा वाद निर्माण झाला. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांची भेट घेत आपला विरोध नोंदवला. यावेळी महिला आघाडीच्या नेत्या संगिता गायकवाड, रेणुका शिंदे, आशा केदारी, शीतल हासे, राजश्री वाकचौरे यांसह इतर सदस्य उपस्थित होत्या. त्यांनी उमेदवाराच्या जाहीरनाम्यासह सविस्तर निवेदन सादर केले आणि महिलांविरोधी कलमाबाबत तक्रार दाखल केली. या जाहीरनाम्यात भागवत गायकवाड यांनी "जय जवान, जय किसान, जय क्रांती" असे घोषवाक्य देत महिलांसाठी वादग्रस्त प्रस्ताव मांडल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

भागवत गायकवाड यांच्या जाहीरनाम्यात एकूण ४७ कलमे आहेत. यामध्ये पर्यावरण संवर्धन, झाडे तोडण्यास परवाने, दारूमुक्त राज्य, शेतमालाला हमीभाव, मोफत शिक्षण आणि आरोग्य सेवा, तसेच एसटी बसमधून महिला आणि पुरुषांना अर्ध्या तिकिटाची सवलत अशा अनेक योजनांचा समावेश आहे. शेतकऱ्यांसाठी १२ कलमे, नोकरदारांसाठी पाच कलमे, आणि तरुणांसाठी स्वतंत्र पाच कलमे दिली आहेत. मात्र, महिलांवरील १९व्या कलमात वेश्या व्यवसायाला अधिकृत मान्यता देण्याचे आश्वासन दिल्यामुळे हा मुद्दा वादाचा ठरला आहे.

या जाहीरनाम्यामुळे संपूर्ण मतदारसंघात खळबळ उडाली असून महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनांनीही या प्रस्तावाचा निषेध केला आहे. राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराकडून महिलांना वेश्या व्यवसायासाठी परवाने देण्याचा प्रस्ताव समोर येणे, हे महिलावर्गाचा जाहीर अवमान आहे, असे महिला आघाडीचे म्हणणे आहे. त्यामुळे उमेदवाराचा जाहीरनामा तातडीने रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

या वादग्रस्त कलमामुळे निवडणुकीच्या वातावरणात गोंधळ उडाला असून विरोधी पक्षांनीही या प्रकरणावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. हा मुद्दा राजकीय रंग घेत असल्याने भविष्यात या घटनेचे कोणते परिणाम दिसून येतील, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Contact form