'वाळु वहा, तहसीलदार पहा' ही यांची संस्कृती: डॉ. सुजय विखे पा.

भाजपचे युवानेते आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी बुधवारी तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील युवा संकल्प मेळाव्यात आक्रमक भाषण दिले. ते म्हणाले की, "मी अद्याप एकही वाक्य बोललो नाही, तरीही काही लोकांना माझ्याबद्दल चर्चा करायची गरज वाटते. कोणी माझे वडील काढत आहेत, तर कोणी संस्कृतीवर भाष्य करीत आहे. जर खरेच चर्चा करायची असेल, तर महसूलमंत्री म्हणून दोन्ही बाजूंच्या संस्कृतीवर चर्चा होणे गरजेचे आहे." त्यांनी या वक्तव्याद्वारे अप्रत्यक्षपणे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.

डॉ. विखे-पाटील यांच्या मते, थोरातांनी आपल्या मंत्रीपदाच्या काळात शासकीय जमिनी उद्योगधंद्यांसाठी देण्याऐवजी स्वतःच्या संस्था आणि कार्यकर्त्यांच्या फायद्यासाठी वापरल्या. त्यांनी आरोप केला की, गावांच्या गायरान जमिनींचे निर्णय सरपंच आणि ग्रामपंचायतींच्या ठरावाच्या माध्यमातून आपल्या फायद्यासाठी घेतले गेले. "महसूलमंत्र्यांच्या काळात साडेतीनशे कोटी रुपयांच्या जमिनी उद्योगांसाठी वापरल्या नसून, फक्त स्वतःच्या संस्थांना दिल्या गेल्या," असे सांगताना त्यांनी थोरातांवर सडकून टीका केली. दुसरीकडे, आपल्याला मिळालेल्या संधीचा योग्य वापर करत, "पाचशे एकर जमिनी औद्योगिक वसाहतींसाठी देऊन गोरगरीबांच्या मुला-बाळांचे भविष्य सुरक्षित केले," असे विखे-पाटील यांनी म्हटले.

जाहिरातीसाठी 9325024536

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून जिल्ह्यात विखे-थोरात यांच्यात राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. नगर दक्षिणेमध्ये पराभव झाल्याचा बदला घेण्याच्या प्रयत्नात, डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजपकडे संगमनेरची उमेदवारी मागितली असून 'युवा संकल्प घणाघाती टीका मेळाव्या'च्या माध्यमातून तालुक्यात सभा घेऊन शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. या सभांमधून त्यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली. त्यांचे भाषण एकंदरीत थोरातांच्या चाळीस वर्षांच्या राजकीय कारकीर्दीवर आधारित असून त्यांनी त्यांची सत्ता दडपशाही आणि दहशतीच्या जोरावर टिकवली असल्याचा आरोप केला.

या टीकाटिप्पणीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे आणि सुसंस्कृत राजकारणाला एक वेगळी दिशा मिळत असल्याचे चित्र दिसते. एकमेकांवर खालच्या स्तरावर टीका करत असलेल्या या राजकीय नेत्यांमुळे तालुक्यात एक नवीन राजकीय संस्कृती रुजत आहे. तळेगाव दिघे, साकूर येथील सभांनंतर बुधवारी हिवरगाव पावसा येथेही असेच वातावरण होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Contact form