संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील कामगार पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांना "विशेष उल्लेखनीय सेवा पोलीस पाटील राज्यपाल पुरस्कार" प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. अहमदनगरच्या जिल्हा मुख्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगर पालिका आयुक्त यशवंत डांगे, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, गृह उपअधीक्षक हरीश खेडेकर, जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार शरद घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सन्मान चिन्ह व सन्मानपत्र असे या गौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. गोरक्ष नेहे यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या सेवाकाळात सावरगाव तळ गावात लोक कल्याणकारी राज्य व सामाजिक न्यायाची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी केली आहे. त्यांनी शासनाच्या विविध योजना गावपातळीवर प्रभावीपणे पोहोचवल्या व यशस्वीरित्या अंमलबजावणी केली. ई-पिक पाहणी प्रकल्प गावात यशस्वी केला आणि महसूल व कृषी विभागाच्या अनेक जनकल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली. पाणी फाउंडेशन लोकचळवळीच्या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे काम उभे केले. महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, ग्रामविकास, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. कोविड साथीच्या काळात गाव सुरक्षित ठेवण्यासाठीही त्यांनी अत्यंत मोलाचे कार्य केले. पोलीस पाटील म्हणून त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या