रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा केवळ आठ महिन्यांतच कोसळल्याने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये युवक काँग्रेस, शिवप्रेमी संघटना, आणि महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, शिवसेनेचे अमर कतारी, राष्ट्रवादीचे बी. जी. देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि शिवप्रेमी उपस्थित होते. आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सरकारविरोधात निषेध मोर्चा काढला आणि प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले.
डॉ. तांबे यांनी या घटनेला महाराष्ट्राच्या अस्मितेवर झालेला आघात असे संबोधून, शासनाची जबाबदारी टाळण्याच्या वृत्तीवर तीव्र टीका केली. डॉ. जयश्री थोरात यांनी ठेकेदार आणि भ्रष्टाचाराला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.
त्यांनी सरकारवर नौदलावर जबाबदारी ढकलण्याचा आरोपही केला. आंदोलकांनी महाराष्ट्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कोसळण्याच्या घटनेचे तीव्र निषेध व्यक्त केला.
0 टिप्पण्या