संगमनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बोल्हेगाव येथून केली आहे. या मुलीसह आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव सौरभ अरविंद ठाकूर (वय २५, रा. गुजरात; मूळ रा. सागर, मध्यप्रदेश) असे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने संगमनेर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. या गुन्ह्याचा तपास १९ ऑगस्ट २०२४ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे तपास करत असताना आरोपी पीडित मुलीसह बोल्हेगाव (नगर) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलिस पथकासह जाऊन अपहृत मुलगी, आरोपी आणि त्यांचा एक वर्षांचा मुलगा यांना ताब्यात घेतले व संगमनेर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई पोलिस निरीक्षक गजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलिस हेडकॉन्स्टेबल समीर सय्यद, अर्चना काळे, अनिता पवार, आणि छाया रांधवन यांच्या पथकाने केली.
0 टिप्पण्या