संगमनेर हे गाव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात एक महत्त्वाचे स्थान राखून आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी येथे नाट्य स्पर्धा आयोजित केल्या जात असत. याशिवाय, हे कर्मचारी कामगार कल्याण मंडळाच्या तसेच राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांमध्ये सक्रियपणे सहभागी होत असत. विद्युत मंडळाच्या नाटकांसाठी प्रा. जगदीश पिंगळे सर, डॉ. सोमनाथ मुटकुळे, आणि नाशिकचे प्रकाश धात्रक हे दिग्दर्शक म्हणून कार्य करत होते. विशेष म्हणजे पिंगळे सरांची दिग्दर्शनाची एक वेगळी शैली होती. त्यांच्या हाताखाली 'सासरेबुवा जरा जपून', 'नरपशू', 'थेंब थेंब आभाळ', 'संध्या छाया', 'अशी पाखरे येती' यांसारखी उत्तम नाटके साकारली गेली. पिंगळे सर शिस्तप्रिय दिग्दर्शक होते, आणि विद्युत मंडळाच्या नाट्यसंघात सहभागी होणारे कलाकार देखील प्रामुख्याने मंडळाचे कर्मचारीच असायचे, तर महिला कलाकार मात्र बाहेरील असायच्या. या स्पर्धांमध्ये विद्युत मंडळाने अनेक बक्षिसे जिंकून एक परंपरा निर्माण केली.
'थेंब थेंब आभाळ' या नाटकाने राज्यस्तरीय प्रथम बक्षीस मिळवले होते, तर वंदना जोशी यांनी अभिनयाचे रौप्य पदक जिंकले होते. 'अशी पाखरे येती' या नाटकाला राज्य द्वितीय पारितोषिक मिळाले होते. संगमनेरमध्ये 'युवा महेश' नावाचा एक नाट्य ग्रुप देखील होता, ज्यामध्ये मारवाडी समाजातील तरुण सहभागी होत असत. या ग्रुपने देखील विविध एकांकिका स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता.
संगमनेरच्या नाट्यचळवळीला घडवून आणण्यात बोऱ्हाडे बंधूंचा मोठा वाटा होता. सुधाकर बोऱ्हाडे आणि केशवराव बोऱ्हाडे यांनी संगमनेरकरांसाठी दर्जेदार नाटकांचे सादरीकरण केले, आणि त्यांची रसिकता कायम ठेवली. त्यांनी सुरू केलेली परंपरा त्यांच्या चिरंजीव चंद्रकांत बोऱ्हाडे यांनी काही काळ चालवली. मोहन जोशी यांनी देखील संगमनेरमध्ये उत्तम नाटके आणली. परंतु, कवी अनंत फंदी रंगमंचाची जी दुर्दशा झाली, त्यानंतर नाटकांचे सादरीकरण कमी झाले.
दूरदर्शनच्या आगमनाने नाट्यव्यवसायावर मोठा परिणाम झाला. स्थानिक कलाकारांना रंगमंचाची अनुपलब्धता झाल्याने त्यांच्या नाटकांविषयीची ओढ कमी झाली. नूतनीकरणाच्या नावाखाली नाट्यगृह बरेच वर्षे बंद राहिल्यामुळे आलेली मरगळ अजूनही कायम आहे. संगमनेरची नाट्य चळवळ आज हळूहळू मावळत चालली आहे.
चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांच्या क्षेत्रात देखील संगमनेरच्या कलाकारांनी आपली छाप पाडली आहे. कधीकाळी संगमनेरजवळच्या निंबाळे येथे वास्तव्य करणारे विनोदी अभिनेते जॉनी वॉकर यांनी सिनेसृष्टी गाजवली होती. 1976 साली संगमनेरचे युसुफ खान यांनी काही सिनेमांमध्ये छोटे काम केले होते. पुढे त्यांनी संगमनेरमध्ये फोटो स्टुडिओ उघडला. संगमनेरचे राजन झांबरे यांनी 'माहेरची साडी' आणि 'गौराचा नवरा' या सिनेमांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत.
संगमनेरची नाट्य चळवळ जोरात असताना, संस्थेचे सचिव आणि कलावंत वसंत बंदावणे यांनी 1984 साली सिनेमा निर्मितीची तयारी सुरू केली. हा एक धाडसी प्रयोग होता. डॉ. सोमनाथ मुटकुळे यांच्या दिग्दर्शनाखाली 'प्रायश्चित्त' या सिनेमाचे चित्रीकरण सुरू झाले. परंतु, मार्केटिंगची माहिती नसल्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकला नाही. संगमनेरमध्ये बनलेली पहिली दूरचित्रवाणी मालिका देखील वसंत बंदावणे यांच्या नावावर जमा आहे. 2012 साली त्यांनी 'लिनियर फिल्म्स' ही निर्मिती संस्था स्थापन केली, आणि 'बंदिशाळा' ही मालिका तयार केली, जी सह्याद्री वाहिनीवर 52 भागांमध्ये प्रसारित झाली.
संगमनेरच्या कलावंतांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 'तात्या विंचू लागे राहो', 'फुल टू धमाल', 'व्हिक्टोरिया क्रॉस', 'कहा है मुस्कान?' यांसारख्या चित्रपटांची निर्मिती संगमनेरच्या तरुणांनी केली आहे. त्याचबरोबर, संगमनेरचे अनेक कलाकार सध्या देखील चित्रपट आणि मालिकांच्या क्षेत्रात संघर्ष करत आहेत.
![]() |
कांताबाई सातारकर |
संगमनेरचा सांस्कृतिक इतिहास कांताबाई सातारकर आणि रघुवीर खेडकर यांच्या तमाशा मंडळाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. या तमाशा मंडळाने संगमनेरचे नाव सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवले आहे. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पारंपरिक तमाशाची कला जिवंत ठेवली आहे.
![]() |
रघुवीर खेडकर |
संगीत, चित्रकला, शिल्प यांसारख्या कलांतही संगमनेरचे कलावंत अग्रस्थानी आहेत. अनेक नामवंत कलाकारांनी महाराष्ट्रभर आपला ठसा उमटवला आहे. संगमनेरचा सांस्कृतिक इतिहास जपण्यासाठी आणि त्याच्या समृद्धतेला चालना देण्यासाठी अनेक कलावंत आजही झटत आहेत.
0 टिप्पण्या