शेतजमिनीवरील वादातून कुऱ्हाडीने हल्ला, एकास पाच वर्षे कारावास

चुलत भावांमधील वादातून उद्भवलेल्या शेत जमिनीच्या विवादानंतर रागाच्या भरात रात्रीच्या वेळी कुऱ्हाडीने डोक्यावर घाव घालून आणि काठ्या, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात, संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने एक आरोपी दोषी ठरवला आहे. सुरेंद्र देवराम तांगडकर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला पाच वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. मात्र, इतर पाच आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यातील तांगडी (आंबीखालसा) गावात घडलेल्या या प्रकरणात न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी काम पाहिले, तर फिर्यादींच्या वतीने ॲड. अश्विनी घुले आणि ॲड. प्रकाश काळे यांनी सहाय्य केले.

या प्रकरणात सागर पोपट तांगडकर यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीच्या मते, सुरेंद्र देवराम तांगडकर आणि त्यांचा भाऊ राजेंद्र देवराम तांगडकर यांच्यात जमिनीवरून वाद सुरू होता. या वादात पोपट नानाभाऊ तांगडकर यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने वादग्रस्त जमीन नांगरली होती, ज्यामुळे सुरेंद्र देवराम तांगडकर यांना राग आला. रात्रीच्या सुमारास, पोपट तांगडकर शेतात हंगरण्यासाठी गेले असता त्यांच्यावर कुऱ्हाडीने डोक्यावर घाव घालण्यात आला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. 

या प्रकरणाच्या तपासानंतर, न्यायालयात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सुनावणीदरम्यान, साक्षीदारांनी दिलेली साक्ष, तसेच डॉक्टरांनी दिलेली वैद्यकीय माहिती, आणि सरकार पक्षाच्या वकीलांचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायाधीशांनी सुरेंद्र देवराम तांगडकर याला दोषी ठरवत भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७, ३२६, आणि ३२४ नुसार शिक्षा ठोठावली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Contact form