स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे झाली असली तरी संगमनेर-अकोले तालुक्यातील अनेक आदिवासी बांधव अजूनही मुलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. संगमनेर तालुक्यातील पठारभागात विकासातील असमानता उघडकीस आली असून, भोजदरी अंतर्गत येणाऱ्या तीन वस्त्यांनी पहिल्यांदाच आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे.
त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण न झाल्यास मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे, ज्यामुळे प्रशासनाला धास्ती बसली आहे. भोजदरी ग्रामपंचायत अंतर्गत वॉर्ड क्रमांक तीनमधील बाळंद्री (एक), बाळंद्री (दोन) आणि दारसोंडवाडीतील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपली व्यथा मांडली आहे. त्यात त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून रस्त्यांसाठी संघर्ष सुरू असल्याचे आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे नमूद केले आहे.
रस्त्यांची कमतरता विद्यार्थ्यांपासून ते आजारी रुग्णांपर्यंत सर्वांनाच त्रासदायक ठरत आहे. त्यातही स्वातंत्र्यानंतर देखील रस्ते मातीचे आणि निमुळते असल्यामुळे चारचाकी वाहने तिथे जाऊ शकत नाहीत. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे तिन्ही वाड्यांतील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी रस्त्यांची कामे सुरू न झाल्यास मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. भोजदरीच्या तिनही वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या प्रस्तावाला राज्य शासनाची मंजुरी मिळताच कामे मार्गी लागतील, अशी ग्वाही आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या