आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर तालुक्यातील युवकांसाठी एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक प्रकल्प उभारला जात आहे. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा पुढे नेत, थोरात यांनी राज्यातील युवकांना विविध स्पर्धा परीक्षा आणि वाचनासाठी आवश्यक त्या अद्ययावत सुविधांची आवश्यकता ओळखून हा प्रकल्प राबवण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाअंतर्गत, संगमनेर तालुक्यातील नऊ गावांमध्ये अत्याधुनिक अभ्यासिका आणि ग्रंथालये उभारली जाणार आहेत, ज्यातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक तयारीसाठी उत्तम सुविधा मिळणार आहेत.
संगमनेर हे शिक्षणाच्या दृष्टीने अग्रेसर झालेले आहे, आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक युवक-युवतींना या प्रकल्पातून मोठी मदत मिळणार आहे. तरुणांमध्ये वाचनाची सवय आणि शैक्षणिक तयारीसाठी जागरूकता वाढावी, यासाठी डॉ. जयश्री थोरात यांनी 'युवा संवाद' उपक्रमाच्या माध्यमातून युवकांशी थेट संवाद साधला होता. या संवादातूनच विविध गावांमध्ये अभ्यासिका आणि ग्रंथालये उभारण्याची कल्पना पुढे आली. त्यानुसार, डॉ. जयश्री थोरात यांनी पुढाकार घेत पाठपुरावा केला आणि या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली.
या प्रकल्पांतर्गत संगमनेर खुर्द, चंदनापुरी, धांदरफळ बुद्रुक, समनापुर, कोकणगाव, राजापूर, डोळासने, तळेगाव दिघे, नान्नज दुमाला, डिग्रस, निमगाव बुद्रुक, आणि वेल्हाळे या गावांमध्ये अभ्यासिका आणि ई-लायब्ररी उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक गावासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, ज्यातून या अत्याधुनिक लायब्ररी उभ्या राहतील. या लायब्ररीमध्ये विद्यार्थ्यांना ई-लायब्ररी सुविधेसह शैक्षणिक पुस्तके, अभ्यासिका आणि वाचनासाठी उत्तम व्यवस्था उपलब्ध होईल.
राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच आदर्श प्रकल्प ठरणार आहे, ज्यामुळे तरुण वर्गात वाचन संस्कृती वाढवण्यास मोठी मदत होणार आहे. संगमनेर तालुक्यातील युवक, युवती आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व व्यक्तींनी या अभिनव उपक्रमाचे स्वागत केले आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक अनमोल संधी ठरेल.
यशोधन जनसंपर्क कार्यालयात आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी विविध पुस्तकांचा संग्रह उपलब्ध करून दिला जात आहे. तलाठी, ग्रामसेवक, बँकांच्या परीक्षा, नेट-सेट, नीट, सीईटी, पोलीस भरती, वनरक्षक, जेईई अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके आणि तयारीसाठी आवश्यक ते साहित्य याठिकाणी उपलब्ध आहे. या सुविधांचा तालुक्यातील अनेक विद्यार्थी आणि युवकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे. संपूर्ण प्रकल्पामुळे संगमनेर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती होणार असून, हे मॉडेल राज्यभर आदर्श ठरण्याची शक्यता आहे.
0 टिप्पण्या