संगमनेर: तालुक्यातील देवगाव येथे पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी, ११ तारखेला संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने योगिता आकाश पानसरे या ३८ वर्षीय महिलेला हल्ला करून ठार केले. या घटनेने गावात संताप व्यक्त होत असून, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आकाश पानसरे हे देवगाव येथील रहिवासी असून, ते दूध उत्पादक शेतकरी आहेत. त्यांचे कुटुंब मोठे असून, पत्नी योगिता, तीन मुले आणि इतर कुटुंबीय त्यांच्यासोबत राहतात. या घटनेच्या दिवशी योगिता पानसरे पानोबा वस्तीवर मका कापणीसाठी गेल्या होत्या. याच दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. बिबट्याने योगिता पानसरे यांना काही अंतरापर्यंत ओढत नेले, परंतु शेतातील इतर महिलांनी हा प्रकार पाहून जोरजोरात आरडाओरड केली. त्यानंतर बिबट्या तेथून पळून गेला.
हल्ल्याच्या वेळी झालेल्या जखमांमुळे योगिता पानसरे गंभीर जखमी झाल्या होत्या. शेतातील महिलांनी तात्काळ मदत मागवून त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले; मात्र दुर्दैवाने उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, वन विभागाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
संगमनेर तालुक्यात बिबट्यांचे हल्ले हे नवीन नसून, यापूर्वीही अनेकवेळा अशा घटना घडल्या आहेत. या परिसरात वन्यजीवांच्या वस्तीमध्ये वाढ होत असल्याने मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांनी वन विभागाकडे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे, आणि प्रशासनाने याबाबत तातडीने पावले उचलावी, अशी मागणी होत आहे.
योगिता पानसरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तीन मुलांची आई असलेल्या योगितांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. गावातील लोकांनी त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे गावातील महिलाही आता शेतामध्ये काम करण्यासाठी भीतीने जात आहेत.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी योग्य ती कारवाई केली जावी. तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने तातडीने पिंजरा लावावा आणि ग्रामीण भागातील लोकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
0 टिप्पण्या