मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यार्थिनीने शहरातील एका महाविद्यालयात प्रथम वर्ष शास्त्र शाखेत प्रवेश घेतला आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून, आरोपी विद्यार्थी, जो दुसऱ्या शाखेत शिकत आहे, कॉलेज सुटल्यावर तिच्याशी बोलण्याचा वारंवार प्रयत्न करत होता. मात्र, विद्यार्थिनी त्याच्याशी संवाद साधण्यास टाळाटाळ करत होती.
सात ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास महाविद्यालयात असताना, या विद्यार्थ्याने तिचा पाठलाग केला आणि तिला "माझ्याशी का बोलत नाहीस?" असे विचारले. त्यानंतर, धमकी देत, "जर तू माझ्याशी बोलली नाहीस, तर तुझ्या चेहर्यावर अॅसिड टाकेन. तु माझ्याशी रिलेशनमध्ये आली नाहीस तर तुझ्यावर अत्याचार करेन," असेही धाडसाने सांगितले. या धमकीने घाबरलेल्या विद्यार्थिनीने घटनेबद्दल तिच्या बहिणीला सांगितले.
११ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा सातच्या सुमारास, मुलगी आणि तिची बहीण आरोपीला समजावण्यासाठी एका कॅफेमध्ये गेल्या. दोघींनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने कोणतीही समज घेतली नाही. कॅफेच्या बाहेर येताच, "तु माझी नाही झालीस, तर तुला कोणाची होऊ देणार नाही," असे म्हणून त्याने मुलीचा हात धरला, तिचे कपडे ओढले आणि असभ्य वर्तन केले. त्यानंतर त्याने जिवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता, "तु माझी नाही झालीस, तर मी आत्महत्या करेन," असेही तो म्हणाला.
या प्रकारानंतर, मुलगी आणि तिची बहीण घरी परतल्या आणि १४ ऑक्टोबर रोजी त्यांनी घडलेली घटना आपल्या पालकांना सांगितली. पालकांच्या मार्गदर्शनानुसार, विद्यार्थिनीने शहर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉस्को कायद्यांतर्गत आणि अन्य विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत, आणि आरोपीला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
0 टिप्पण्या