मुस्लिम, ख्रिश्चन, मराठा, धनगर तसेच वंचित आणि दुर्बल घटकांना आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आरक्षणाची अंमलबजावणी करून समाजातील या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने पुणे ते दिल्ली दरम्यान सामाजिक न्याय पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांना दिली गेली. पदयात्रेच्या आयोजकांनी थोरात यांची त्यांच्या कारखान्यावर भेट घेतली, आणि त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
सामाजिक न्याय पदयात्रेचे प्रमुख असलम बागवान यांनी स्पष्ट केले की, अनेक वर्षांपासून आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. राजकीय हेतूंनी समाजाचा उपयोग फक्त मतदानाच्या काळात केला जातो, मात्र वास्तविक विकास होत नाही. त्यांनी असेही नमूद केले की आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये इंदिरा सहानी यांच्या 1992 च्या अहवालानुसार आरक्षणाची मर्यादा वाढविण्यात आली आहे. त्यामुळे संसदेमध्ये सामाजिक न्यायानुसार आरक्षणाची क्षमता वाढवणे गरजेचे आहे. यासाठी प्रसार आणि प्रचार करून सरकारचे लक्ष वेधणे आवश्यक आहे, याच उद्देशाने सामाजिक न्याय पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.आमदार बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी सरकार समाजातील सर्व घटकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. त्यांनी असेही स्पष्ट केले की, सर्व घटकांना न्याय मिळावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. या पदयात्रेचे संगमनेर शहरामध्ये ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. पदयात्रेत असलम बागवान, सादिक भाई मजाहिटी, नाजीमा शेख, हालीना शेख, फातिमा शेख यांच्यासह एकता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष असिफ शेख, महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले, अफसर तांबोळी, सादिक तांबोळी, शोहेब सय्यद, प्रा. बाबा खरात, बाळासाहेब गायकवाड, अँड. प्रसाद सांगळे, लाजारस केदारी, सिमोन रूप टक्के, श्रीधर भोसले, प्रभाकर चांदेकर, जाकीर पेंटर, फ्रान्सिस भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पदयात्रेत 'संविधान बचाओ, देश बचाओ' अशा घोषणांनी वातावरण उत्साही बनले होते. या पदयात्रेचा उद्देश शासनाला आरक्षणाच्या मुद्द्यावर जागृत करणे आणि सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस पावले उचलली जावीत असा आहे.
0 टिप्पण्या