संगमनेर: इतिहासात पहिल्यांदाच मुस्लिम बांधवांचा कत्तलखान्याविरोधात मोर्चा

संगमनेर: इतिहासात पहिल्यांदाच मुस्लिम समाजाच्या वतीने गोहत्या बंद करा आणि संगमनेर तालुक्यातील कत्तलखाने बंद करा, अशी मागणी करत संगमनेर शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कत्तलखाने बंद करण्याची मागणी करत पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.

बुधवारी रात्री घडलेल्या एका घटनेनंतर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. काही कसायांनी समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात काही ठिकाणी दगडफेक झाली, तसेच नंग्या तलवारी घेऊन नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न झाला. या दहशतीमुळे मुस्लिम समाजातील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि त्यांनी या घटनांच्या निषेधार्थ प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.

संगमनेर शहरातील भारत नगर, मौलाना अब्दुल कलाम आझाद मंगल कार्यालय, जमजम कॉलनी या परिसरांमध्ये सर्रासपणे गुंडशाही करून काही लोक गोवंश जनावरांची आणि छोट्या वासरांची रात्री-अपरात्री कत्तल करत आहेत. हे प्राणी शासनाने बंदी घातलेले असतानाही, त्यांची कत्तल केली जाते आणि त्यानंतर मुंबई, हैदराबाद, गुलबर्गा या शहरांमध्ये तस्करी केली जाते. यामुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होतो.

याशिवाय, कत्तलीनंतर उरलेले वेस्टेज मटेरियल मौलाना अब्दुल कलाम आझाद मंगल कार्यालयाच्या पाठीमागील नाटकी नाल्यात टाकले जाते. यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. अनेक वेळा नगरपालिकेला आणि संबंधित लोकांना समज देऊनही त्यावर काहीही परिणाम होत नाही. गुंडशाही करणारे लोक राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून, कधी पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आपले अवैध व्यवसाय चालू ठेवत आहेत.

या परिस्थितीत, फक्त हिंदू समाजच नाही, तर मुस्लिम समाजालाही तोच त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासाची जाणीव प्रशासनाला करून देण्यासाठी गेलेल्या मुस्लिम समाजातील काही नागरिकांना त्यांच्या घरात घुसून मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे संतापलेल्या मुस्लिम समाजाने थेट मोर्चा काढून प्रशासनाला धारेवर धरले.

संपूर्ण घटनेत मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी कत्तलखाने बंद करण्याची आणि अवैध गोवंश तस्करी थांबवण्याची मागणी केली. तसेच त्यांनी प्रशासनाला कठोर कारवाई करण्याची विनंती केली, ज्यामुळे अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळली जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Contact form