संगमनेर येथे आयोजित सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५७व्या वार्षिक सभेत माजी मंत्री आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपले विरोधकांवर जोरदार टीका केली. थोरात यांनी सांगितले की, निळवंडे धरण आणि कालव्यांच्या कामात अनेक अडचणींवर मात करून त्यांनी हे प्रकल्प पूर्ण केले, परंतु ज्यांचे कोणतेही योगदान नाही, ते आता केवळ फोटो काढण्यासाठी पुढे येत आहेत. वास्तविकता मात्र संपूर्ण तालुक्याला आणि राज्याला माहीत आहे.
थोरात यांनी सांगितले की, काही लोक चांगल्या वातावरणात भेदभाव निर्माण करून विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत, तसेच सत्तेचा गैरवापर करून दहशत निर्माण करत आहेत. मात्र, अशा दहशत निर्माण करणाऱ्यांचा बंदोबस्त आगामी काळात केला जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. निळवंडे धरण पूर्ण करताना प्रकल्पग्रस्तांना सन्मानाने पुनर्वसन केले गेले आणि त्यांना नोकऱ्याही देण्यात आल्या. या कामात ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकर पिचड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र, आज ज्यांनी धरणाच्या कामात कोणताही सहभाग दिला नाही, ते लोक फोटो काढत फिरत आहेत.
थोरात यांनी पुढे सांगितले की, चिंचोली गुरव येथील परिषदेतून त्यांनी निळवंडे धरणासाठी पाठपुरावा केला होता, आणि आज सर्व धरणे पाण्याने भरलेली आहेत. वितरिकांच्या कामाचे शेवटचे टप्पे अद्याप बाकी असून, त्यावरही काम करायचे आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्षेत्राला पाणी देणे हे आपले ध्येय आहे.
विरोधक तालुक्यात विष कालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करताना थोरात यांनी सांगितले की, अनेक कार्यकर्त्यांवर खोट्या गुन्ह्यांतून खटले दाखल करण्यात आले आहेत. परंतु, जनतेच्या पाठिंब्यामुळे या दहशतीचा बंदोबस्त नक्कीच केला जाईल. त्यांनी सांगितले की, महसूल मंत्री म्हणून कार्यरत असताना, कधीही कोणाची अडवणूक केली नाही आणि विरोधकांच्या संस्थांना मंजुरी दिली. सर्वांना बरोबर घेऊन विकास करणे ही आपली संस्कृती आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ आणि डॉ. जयश्री थोरात यांनीही आपले विचार व्यक्त केले. वार्षिक सभेत विविध मान्यवरांनी सहभाग घेतला, आणि कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.
0 टिप्पण्या