संगमनेर तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींनी माझी वसुंधरा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत एकूण 4 कोटी रुपयांची बक्षिसे मिळवली आहेत. विकासाच्या संगमनेर पॅटर्नचा संपूर्ण राज्यात गौरव झाला असून, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका राज्य आणि देशपातळीवर विकासाचे मॉडेल म्हणून उदयास आला आहे. या यशामुळे संगमनेर तालुक्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती आमदार थोरात यांच्या संपर्क कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली.
पत्रकात म्हटले आहे की, संगमनेर तालुका भौगोलिक दृष्ट्या विस्तारित असून त्यात 171 गावे आणि 248 वाड्या-वस्त्या समाविष्ट आहेत. तालुक्याचा प्रमुख व्यवसाय दुग्ध व्यवसाय असून सहकार, शिक्षण, आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांत तालुक्याने उल्लेखनीय प्रगती केली आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात आणि वाड्यांमध्ये सातत्याने विकासाच्या योजना राबविल्या आहेत, ज्यामुळे तालुका राज्यातील एक दिशादर्शक मॉडेल ठरला आहे. शहरातील हायटेक बसस्थानक, अत्याधुनिक इमारती, आणि समृद्ध बाजारपेठ ही संगमनेरच्या प्रगतीची साक्ष देतात. सहकार, शिक्षण, आणि सांस्कृतिक कार्यात संगमनेरने राज्याला दिशा दिली आहे.
नुकत्याच घोषित झालेल्या माझी वसुंधरा स्पर्धेत तालुक्यातील घुलेवाडी ग्रामपंचायतीने दुसरा क्रमांक मिळवत दीड कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. त्याचप्रमाणे, भूमी विभागातून या ग्रामपंचायतीला 75 लाख रुपयांचे पहिले बक्षीस मिळाले आहे. तीगाव ग्रामपंचायतीने राज्यातून तिसरा क्रमांक मिळवत 50 लाख रुपयांचे बक्षीस जिंकले आहे, तर खांडगाव ग्रामपंचायतीने सहावा क्रमांक मिळवत 50 लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त केले आहे.
विभागीय स्तरावरही संगमनेर तालुक्याने उल्लेखनीय यश मिळवले आहे. गुंजाळवाडी, धांदरफळ बुद्रुक, पेमगिरी, चिंचोली गुरव, लोहारे आणि देवकौठे या ग्रामपंचायतींना प्रत्येकी 15 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. एकूण दहा ग्रामपंचायतींनी 4 कोटी रुपयांची बक्षिसे मिळवली असून, संगमनेर तालुका राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला आहे.
या यशस्वी कामगिरीमुळे आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात आणि इतर मान्यवरांनी सर्व ग्रामपंचायतींना अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या