बदलापूरमधील चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचारामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. संगमनेरमध्येही पोलीस प्रशासनाने निर्भया पथकाची स्थापना केली आहे आणि त्यांना विविध जबाबदाऱ्या दिल्या आहेत. संगमनेर शहरात अनेक शाळा आणि कॉलेज असल्यामुळे, ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संगमनेर पोलिसांनी सक्रिय पावले उचलली आहेत.
पथकाने शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थिनींना सुरक्षेसंबंधी उपाययोजनांबाबत माहिती दिली आहे. शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. महिला सुरक्षेसाठी मार्गदर्शन केले जात आहे आणि आवश्यक त्या उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक आणि सध्या बढती मिळालेले उपविभागीय पोलिस अधिकारी बापूसाहेब महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनम फडोळ, हेड कॉन्स्टेबल संगीता डुंबरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सोमेश्वरी शिंदे, आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल शीतल बहिरट यांच्या नेतृत्वाखाली निर्भया पथक तयार करण्यात आले आहे. नागरिकांना 112 या टोल-फ्री क्रमांकावर किंवा संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या संपर्क क्रमांकांवर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या