संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग गावातील राखीव वन जमिनीचे बेकायदेशीर वाटप महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि तथाकथित लाभार्थ्यांनी संगनमत करून न्यायालयाला अंधारात ठेवून केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत, मंत्री मुनगंटीवार यांनी वनविभागाच्या प्रधान सचिवांना तातडीने चौकशी करून दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जवळेकडलग येथील राखीव वन क्षेत्रातील सुमारे 480 एकर जमिनीचे वाटप गैरकायदेशीर पद्धतीने करण्यात आले आहे. शासनाच्या अटी-शर्तींचे पालन न करता, लाभार्थ्यांच्या पात्रतेची तपासणी न करता हे वाटप केले गेले आहे. 90 च्या दशकात स्वर्गीय बाबुराव रावजी वामन यांनी या बेकायदेशीर वाटपाची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांना दिली होती, परंतु त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. परिणामी, लाभार्थ्यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला, ज्यात शासकीय अधिकाऱ्यांनी योग्य बाजू मांडली नाही, त्यामुळे न्यायालयाने हद्दी आणि खुणा कायम ठेवण्याचे आदेश दिले. याचवेळी आढळा नदीवरील उडान धरण आणि कालव्यांचा सपाटीकरण करताना नाश झाला, वनक्षेत्रातील झाडांची विनापरवाना कत्तल आणि जंगली प्राण्यांच्या वसाहतींचे नष्टिकरण देखील केले गेले आहे. या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
0 टिप्पण्या